माजलगाव जि. बीड (वृत्तसंस्था) दोन दिवसांपूर्वी अगदी थाटामाटात लग्न पार पडलं. अंगावरची हळदही उतरली नाही तोच नवरदेवाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील नित्रुड येथे घडली. पांडुरंग डाके असे मयत नवरदेवाचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सत्यनारायणाची महापूजा होताच नवरदेवाची आत्महत्या
तालुक्यातील नित्रुड येथे पांडुरंग रामकिसन डाके (वय २६) हा युवक शेती व किराणा दुकानाचा व्यवसाय करतो. शनिवारी (ता.२०) माजलगाव येथील मंगल कार्यालयात थाटामाटात लग्न झाले. यानंतर आज सोमवारी वधू-वरांकरीता सत्यनारायण महापूजाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त नातेवाईकांना जेवणाचे निमंत्रण देण्यात आले. सत्यनारायण पूजा आटोपल्यानंतर नवरदेवाने जेवण केले आणि पाय दुखत असल्याचे सांगत शेतात जाऊन येतो म्हणत त्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेजाऱ्यांने कुटुंबाला दिली माहिती
शेजारील शेतकऱ्याने सदरील घटना डाके कुटूंबीयांना सांगितली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करीता ग्रामीण रूग्णालयात पाठविला. दरम्यान, आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही. हळद अंगावरील फिटण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे.