नाशिक (वृत्तसंस्था) शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मुंढेगाव एमआयडीसीतील जिंदाल कंपनीत स्फोट झाल्याने रविवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. मागील तीन तासापासून इथे स्फोट होत असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री घटनास्थळी भेट देणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळ असलेल्या जिंदाल पॉलिफिल्म्स या कंपनीला आग लागल्यानंतर मोठे स्फोट ऐकू आले. या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार काम करतात. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीत असलेल्या रसायनांचा स्फोट झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काहींच्या मते हा स्फोट बॉयलरचा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. आग भीषण असून प्रचंड धुराचे लोट उसळले आहे. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येत आहेत आणि खरंतर जी पहिली कंपनीची इमारत जळाली होती त्या ठिकाणाहून दोन ते तीन कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न देखील प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.
जिंदल कंपनीतील स्फोटाची भीषणता लक्षात घेऊन डॉक्टर्स परिचारिका वॉर्ड बॉय आदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तर दुसरीकडे आग लागलेल्या शाफ्ट जवळ अवघ्या 150 मीटर अंतरावर मोठी इंधन टॅंक आहे. या मोठ्या टाकीत, जवळपास 20 हजार डिझेल असल्याची माहिती समोर आली आहे. जिंदाल कंपनीतील डिझास्टर यंत्रणा माहिती असलेला एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी नसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील आपत्कालीन यंत्रणेचा, माहिती नसल्यानं अद्याप कोणताही उपयोग झाला नाही. प्रचंड धूर झाल्याने, बचावकार्यात प्रशासनाला अनेक अडचणी येत आहे.