मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई सेंट्रल बेस्ट बस डेपोजवळ असलेल्या ‘सिटी सेंटर मॉल’ मध्ये गुरुवारी रात्री लागलेली आग अजूनही विझलेली नाहीय. दरम्यान, आगीची भीषणता पाहता अग्निशमन दलाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने ‘सिटी सेंटर मॉल’ नजीकच्या ‘ऑर्किड एन्क्लेव’ या ५५ मजली इमारतीमधील अंदाजे ३,५०० रहिवाशांचे सुरक्षिततेदृष्टीने जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.
नागपाडा येथील तळमजला अधिक तीन मजली सिटी सेंटर मॉलमध्ये बुधवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने आगीच्या ठिकाणी धाव घेऊन युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू केले. मात्र काही अवधीतच आगीचा भडका उडाला व रात्री ९.२३ वाजताच्या सुमारास आग लेवल -२ ची झाल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. मात्र आग आटोक्यात न आल्याने आणि आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाने या आगीची लेवल -३ झाल्याचे रात्री १०.४४ वाजता, आगीची लेवल ४ झाल्याचे रात्री ११.४७ वाजता जाहीर केले. मात्र त्यानंतरही आग आटोक्यात न आल्याने आणि आगीची तीव्रता आणखीनच वाढल्याने अखेर रात्री २.४१ वाजताच्या सुमारास आगीची लेवल – ५ झाल्याने ‘ब्रिगेड कॉल’ जाहीर करण्यात आला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे २४ फायर इंजिन, १७ जंबो टँक, ६ वॉटर टँकर्स यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने घटनास्थळी कार्यरत आहेत. तसेच, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण २५० अधिकारी व कर्मचारी आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.