पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बांभोरी येथील हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टीम कंपनीमध्ये वेतनवाढीसह कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना परत घ्यावे, या मागणीसाठी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. आंदोलनस्थळी आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देत मध्यस्थी केली. संपावर बसलेल्या कामगारांची भेट घेत उद्यापर्यंत कामगार हिताचा निर्णय घेण्यास कंपनी प्रशासनाला घेण्यास सांगू, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले.
बांभोरी येथील हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टम इंडिया प्रा.लि. या कंपनीतील कामगार काही दिवसांपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. याठिकाणी बुधवारी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी भेट दिली होती. त्यानंतर आज खुद्द पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी संपावर गेलेल्या कामगारांची भेट घेतली. तसेच कंपनी प्रशासनासोबत चर्चा करून शुक्रवारपर्यंत कामगार हिताचा निर्णय घेण्यास भाग पाडू आणि संप मिटवू, असेही ना. पाटील यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्थ केले. यावेळी अनिलशेठ नन्नवरे, ईश्वर शेठ नन्नवरे, सरपंच सचिन बिऱ्हाडे, शांताराम महाराज, माजी सरपंच राकेश नन्नवरे,भिकन शेठ, रवींद्र शेठ, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.