धुळे (प्रतिनिधी) अस्टिटंट ब्रांच मॅनेजरने महिला कर्मचार्याची छेडछाड केल्याचा गंभीर प्रकार नुकताच समोर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मॅनेजरकडून असहनीय छेडछाड होत असल्याने पीडित महिलेने अखेर उबाठा शिवसेनेच्या कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेच्या रणरागिणींनी या मॅनेजरला चांगलाच चोप देत आझादनगर पोलीस ठाण्यात जमा केले. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील ग.नं. ६ पारोळा रोड येथील रिलायन्स लाईफ इन्शोरन्स या खाजगी कंपनीत नितीन सोमनाथ पाटील (रा. निकुंभे, ता.धुळे, ह.मु. हजारे कॉलनी, जीटीपी स्टॉपजवळ,देवपूर, धुळे) हा असिस्टंट ब्रँच मॅनेजर म्हणून कामाला आहे. याच कंपनीत एक विवाहित महिलाही नोकरीवर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो या महिलेला निरनिराळ्या प्रकारे त्रास देऊन अंगलट करण्याचा प्रयत्न करत होता. दिवसेंदिवस त्याची हिंमत वाढतच होती. त्यातच त्याने ‘मुझे प्यार हो गया‘ असा मॅसेज महिलेला पाठविला. यामुळे महिलेचा संयम सुटल्याने याबाबत थेट शिवसेनेच्या कार्यालयात तक्रार दिली.
त्यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी हेमा हेमाडे, शुभांगी पाटील यांनी शिवसैनिकांसोबत थेट शहरातील ग.नं.६मधील कंपनीचे कार्यालय गाठले. आणि असिस्टंट मॅनेजर नितीन पाटील याला कार्यालयातच चोप देण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याला ओढून आझादनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. आझाद नगर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यातील प्रमोद पाटील यांच्याकडे शिवसेनेच्या रणरागिणींनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, या ब्रांच मॅनेजरच्या अश्लिल वर्तवणुकीला वैतागून यापुर्वी काही महिलांनी काम सोडल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त ‘मटा’ने दिले आहे.