बीड (वृत्तसंस्था) आष्टी तालुक्यातील गुंडवाडी येथे विजेच्या खांबाला ताण देणाऱ्या तारेला हात लागल्याने शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बबन जयवंत जाधव (वय ३८), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
गुंडवाडी येथील बबन जाधव शेतात शनिवारी सकाळी औताने मशागत करत होते. यावेळी औत विजेच्या खांबाला ताण देणाऱ्या तारेत अडकले. खांबावरील वीजप्रवाह ताण देणाऱ्या तारेत उतरलेला होता. त्यामुळे औत काढत असताना त्यांना शॉक लागला आणि ते जागीच गतप्राण झाले. यामुळे बीडसांगवी गुंडवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात वडील-आई, पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, महावितरणाच्या भोंगळ कारभारावर टीका करत गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.