तिरुअनंतपुरम (वृत्तसंस्था) केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. ‘मेट्रो मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन भाजपच्यावतीने केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. लवकरच भाजपच्यावतीनं याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मेट्रो मॅनच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या श्रीधरन यांची लोकप्रियता पक्षासाठी केरळ निवडणुकांध्ये महत्त्वाची ठरणार आहे.
केरळमध्ये भाजपची सत्ता आल्यास ई श्रीधरन हे मुख्यमंत्री असतील. ८८ वर्षांच्या ई श्रीधरन हे देशभरात मेट्रोमॅन म्हणून ओळखले जातात. गेल्याच आठवड्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच ई. श्रीधरन मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा रंगली होती. अखेर आज या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या केरळमध्ये ‘विजय यात्रे’च्या माध्यमातून प्रचार सुरु आहे. पक्षाकडून लवकरच उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती के. सुरेंद्रन यांनी दिली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांआधी ई श्रीधरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ते म्हणाले की, मोदी देशातील सर्वात योग्य लीडर्सपैकी एक आहेत. त्यांच्या हातून देशाचं भविष्य उत्तम होऊ शकतं. असं मानलं जात आहे की, ई श्रीधरन यांनी खूप दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं होतं. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर ते म्हणाले की, “भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय एका दिवसांत घेतलेला नाही. मला राज्यासाठी काम करायचं आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करत आहे. केरळ सरकारच्या मेट्रो प्रोजेक्टसाठी कंसलटेंसीसुद्धा आता मी बंद करणार आहे.”
ई श्रीधरन यांच्या नावावर दिल्ली मेट्रोसह पहिल्या फ्रॅट कॉरिडोरला वेळेआधी पूर्ण करण्याचं श्रेय आहे. ई श्रीधरन यांना २००१ मध्ये पद्म श्री आणि २००८ मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. फ्रान्स सरकारनेही ई श्रीधरन यांनी २००५ मध्ये सर्वोच्च नागरिक सन्मान देऊन सन्मानित केलं होतं. एवढंच नाहीतर अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मॅगझिनने त्यांना एशिया हिरो या नावाने सन्मानित केलं होतं