अमरावती (वृत्तसंस्था) मोर्शी येथील शिवाजीनगरमधील एका घरातील दिवानच्या बॉक्समध्ये शुक्रवारी मायलेकाचा कुजलेला मृतदेह आढळला होता. त्या प्रकरणात अज्ञाताविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मयत महिलेचा मोठा मुलगा बेपत्ता असल्याने त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला आहे. नीलिमा गणेश कापसे (४५) व आयुष गणेश कापसे (२१) अशी मृतकांची नावे आहेत.
मयत महिलेचा मोठा मुलगा सौरभ कापसे (२४) हा मागील पाच ते सहा दिवसांपासून बेपत्ता आहे. गोदाबाई बबनराव बलगे (रा. कोंढाळी) असे तक्रारकर्त्या महिलेचे नाव असून, त्या नीलिमा कापसे यांच्या आई आहेत. गोदाबाई बलगे व त्यांच्या पतीने नीलिमा, आयुष व सौरभलाही वारंवार कॉल करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तशात घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मयताच्या नातेवाईकांना कळवले. त्यामुळे गोदाबाई व त्यांचे पती मोर्शी येथे आले असता, सदर घटना उघडकीस आली.
नीलिमा व आयुष या दोघांची हत्या करून मृतदेह प्लॅस्टिक पन्नीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. शनिवारी सकाळी कुजलेल्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. नीलिमा व तिचा मुलगा आयुष यांच्यावर पाळा मार्गावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक अविनाश सातव व मोर्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली. सौरभ कापसे याचे नेहमीच त्याची आई व भावासोबत वाद होत असल्याची माहिती तक्रारकर्त्या गोदाबाईंनी पोलिसांना दिली. सध्या सौरभचा मोबाइलही बंद असल्याने त्याच्यावरच संशयाची सूई रोखली आहे. दरम्यान, नीलिमा कापसे वनविभागात कंत्राटी पद्धतीने संगणक परिचालक म्हणून कार्यरत होत्या, तर आयुष कापसे हा अमरावती येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
दरम्यान, सौरभ याचे वडील वारले आहेत. यामुळे आईनेच त्याचा आणि लहान भावाचा सांभाळ केला. सौरभचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध सुरु होते. मात्र त्याच्या आईला हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. यावरुन दररोज घरी वाद होत असत. अखेर हा वाद विकोपाला गेला आणि सौरभने आई आणि लहान भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपीने दोन्ही मृतदेह घरातील दिवाणमध्ये टाकून दाराला कुलूप लावून फरार झाला, असे टीव्ही ९ ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.