मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) ईडी (ED)च्या रडारवर असल्याचं दिसत आहे. ईडीचे पथक आज सकाळी नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले आणि त्यानंतर नवाब मलिक हे ईडी कार्यालयात दाखल झाले. मुंबईतील ईडीच्या कार्यालयात त्यांची ईडी अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.
आर्थिक गैरव्यवहार संबंधित चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, मलिक ईडी कार्यालयात सकाळीच ७.३० वाजता पोहोचल्याची माहिती आहे. ईडीने नवाब मलिक यांना चौकशीसाठीचे समन्स पाठवले होते. नवाब मलिक बुधवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. दरम्यान, हे प्रकरण डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी जोडलेले आहे. त्यामुळे या चौकशीकडे लक्ष लागले आहे.
आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी हे नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी आणि जबाब नोंदवणार आहेत. मलिकांचे अंडर्वर्ल्डशी संबंध आहे का याची चौकशी होणार आहे. दाऊदवर एनआयएने गुन्हा नोंदवल्यानंतर ईडी चौकशीला वेग आला आहे. दाऊदच्या साथादारांच्या घरांवर ईडीचे छापे मारण्यात आले होते. दरम्यान, दाऊदच्या भावाचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे.