हिंगोली (वृत्तसंस्था) शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला एका पिकअप टेम्पोची धडक बसल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात वर्षा गायकवाड थोडक्यात बचावल्या असून पोलिसांनी टेम्पो चालकास ताब्यात घेतले आहे.
वर्षा गायकवाड या महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री असून हिंगोलीच्या पालकमंत्री देखील आहेत. हिंगोलीतील कामाचा आढावा घेण्यासाठी त्या कालपासून हिंगोली दौऱ्यावर आहेत. वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या आहेत. हिंगोली दौऱ्यावर असताना कारला टेम्पोनं मागच्या बाजूनं धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेली नाही. वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या भरधाव महिंद्रा पीकअपनं वर्षा गायकवाड यांच्या कारला मागच्या बाजून धडक दिली. यामध्ये कारचं मागच्या बाजूनं नुकसान झालं आहे. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही.
या घटनेनंतर पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याला शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.