चाळीसगाव(प्रतिनिधी) तालुक्याच्या विकासात अजुन एक नवीन ओळख उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीच्या रूपाने प्राप्त होणार आहे. 25 कोटी 96 लाखांचा निधी दि.10 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र शासनाने मंजूर करत या कार्यालय बांधकामास हिरवा कंदील दिला आहे.
काही महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले आणि तात्काळ भाडेतत्त्वावर महात्मा फुले कॉलनी येथील शहीद हेमंत जोशी क्रीडांगणावर हे कार्यालय धूमधडाक्यात सुरू करण्यात आले होते. त्या वेळेस एम एच 52 ही ओळख शहराला प्राप्त झाली होती. पण कार्यालय आले आणि त्याला स्वतंत्र इमारत नाही असे आमदार चव्हाण यांच्या नेतृत्वात कसे शक्य होणार. एकीकडे कार्यालयाचे कामकाज सुरू झाले. लोकांची जळगांव पायपीट थांबली. वाहनचालकांना परवाने,वाहन नोंदणी अशी अनेक कामे कार्यालयात सुरू झाली पण दुसरीकडे आमदार चव्हाण यांची स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास इमारत बांधकाम साठी निधी मिळविण्यासाठी मंत्रालयात प्रयत्नांची पायपीट सुरू झाली आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय साठी 25 कोटी 96 लाखांचा निधी आणल्यावरच त्यांच्या प्रयत्नांचे रूपांतर यशात झाले. त्यांच्या प्रयत्नाने यापूर्वी कार्यालय आले होते, आता इमारतीसाठी निधी आला आहे. यामुळे शहराला मिळालेल्या एम एच 52 या ओळखीला शोभेल अशी भव्य दिव्य उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत आमदार चव्हाण यांच्या संकल्पनेतून लवकरच चाळीसगावकरांच्या सेवेत उभी राहणार आहे.
मी केलेले प्रत्येक काम चाळीसगाव तालुका माझे घर व नागरिक माझा परिवार असल्याच्या हेतूनं सुरू आहे. या आपल्या घराला व परिवाराला काय सुख-सुविधा मिळवून देता येतील, यासाठी प्रयत्नशील आहे.आणि जोपर्यंत मूलभूत सुविधांनी परिपूर्ण तालुका होत नाही.तोपर्यंत हा विकास आणि मी देखील थांबणार नाही
— आमदार मंगेश चव्हाण