जळगाव (प्रतिनिधी) एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील यांचा पुतण्या समीर पाटील यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या आवारात ठेक्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात राहुल सोनवणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात फिर्याद देण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, समीर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे ठेकेदार मित्र सचिन सनेर गुरुवारी परोळा तालुक्यातील आमलोद मोळ -शहदा- सांगवी- हातेड- अमळनेर- भडगाव- पाराेळा रस्ता राज्यमार्गाची निवीदा उघडणार होती. ही निवीदा समीर यांच्यासह सचिन पी. सनेर यांनी भरली होती. सचिन सनेर बाहेरगावी गेलेले असल्याने या निविदेच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात जळगावला आलेले होते. या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांची कार ( क्र एम एच १९ – बीयू ३३००) राहुल शांताराम सोनवणे आणि त्याच्या जवळपास ८ साथीदारांनी अडवून त्यांना शिवीगाळ करीत आयुष्य बरबाद करण्याची धमकी दिली. यावेळी समीर पाटील यांच्या सोबत त्यांचा कारचालक होता तर त्यातील काही जणांनी त्यांच्या कारची समोरची मोठी काच दगड मारून फोडली. मात्र प्रसंगावधान राखत समीर पाटील चालकासह तेथून कार घेऊन निघून गेले त्यानंतर राहुल सोनवणे याने सचिन सनेर यांनाही फोन करून शिवीगाळ करीत धमक्या दिल्या.
यासंदर्भात पुढील तपास पो नि रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो उ नि प्रदीप चांदेलकर करीत आहेत.