चाळीसगाव (प्रतिनिधी) ऊसतोडणी कामाच्या निमित्ताने मराठवाड्यातील धाराशिव येथील साखर कारखान्यावर काम करत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे तांडा येथील कांतीलाल देविदास राठोड यांच्या वारसांना आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते ५ लाखांच्या मदतीचा धनादेश आज सुपूर्द करण्यात आला. यावेळी माजी जि.प. सभापती राजेंद्र राठोड, माजी पंचायत समिती सभापती विजय जाधव, माजी कृउबा सभापती कपिल पाटील, संजय गांधी समिती सदस्य दिनकर राठोड, जेष्ठ नेत्या नमोताई राठोड, राम पाटील आदी उपस्थित होते.
तालुक्यातील हजारो कुटुंब हे ऊसतोडणीच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या साखर कारखान्यांवर जात असतात. अतिशय जोखमीचे असणारे ऊसतोडणीचे काम करत असताना अपघात होऊन आजवर अनेक ऊसतोड कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे तसेच अनेकांच्या नशिबी अपंगत्व देखील आले. मात्र भाजपा महायुती सरकारच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन झाल्याने ऊसतोड कामगारांना सुरक्षा कवच प्राप्त झाले असून या महामंडळाच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील कै. कांतीलाल राठोड ऊसतोड कामगाराच्या वारसांना याचा लाभ मिळाला आहे.
वरखेडे तांडा येथील कै.कांतीलाल देविदास राठोड हे ऊसतोडणी कामानिमित्त बाणगंगा सहकारी साखर कारखाना जवळा ता.भूम जि. धाराशिव येथे गेले असता तेथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ६.२.२०२४ रोजी घडली होती. मयत कांतीलाल राठोड यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना आधार देणे गरजेचे होते. याबाबत समाजकल्याण विभागाने आवश्यक तो प्रस्ताव तयार करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवला असता त्याला मंजुरी मिळाली व कै. कांतीलाल राठोड यांच्या वारसांना ५ लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असता आज ती आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते वितरीत करण्यात आली.