चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विकास कामांचा धूमधडाका सुरूच असून चाळीसगाव तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रात बूस्टर डोस मिळाला आहे. सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या आरोग्य क्षेत्रातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीनंतर आता सदर रुग्णालयाच्या रुपये 29 कोटी 68 लक्ष रुपये खर्चाच्या मुख्य इमारत बांधकाम अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने दिनांक 19 सप्टेंबरच्या शासन निर्णयाने मान्यता दिली आहे.
चाळीसगाव येथे विशेष बाब म्हणून ३९ खाटांवरून थेट १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घेणे ही राज्यातील दुर्मिळ घटना होती. मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ते शक्य करून दाखवले आहे. नुसते मंजुरी करून आमदार चव्हाण थांबले नाही तर तात्काळ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजूच्या जागेत प्रशस्त जागा त्यांनी आरक्षित केली असल्याने आता थेट बांधकामाला देखील मंजुरी मिळवली असल्याने लवकरच सुसज्ज अश्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात होईल.
चाळीसगाव येथे उपजिल्हा रुग्णालय निर्माण झाल्यानंतर साहजिकच जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हारुग्णालयांचा भार हलका होणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील रुग्णांना गंभीर आजारावरील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक येथे जावे लागत होते त्यामुळे रुग्णांची होणारी ससे होलपट आता थांबणार असून वेळेची व पैशाची बचत होणार आहे. चाळीसगावकर यांना हक्काचे रुग्णालय या निमित्ताने आता सेवेत लवकरच सुरू होणार आहे .
शासनाने सदर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारत बांधकामास व आराखड्यास मंजुरी दिली असून सदर बांधकामांमध्ये विद्युतीकरण,पाणीपुरवठा, मलनिसारण, आगप्रतिबंधक, अंतर्गत रस्ता, फर्निचर ,पार्किंग, संरक्षण भिंत, गेट ,भूविकास, लिफ्ट, वातानुकूलित यंत्रणा इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.