जळगाव (23 नोव्हेंबर 2024) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार सुरेश भोळे हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. आमदार राजूमामा यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आतिषबाजी करुन व पेढे भरवून साजरा केला जात आहे.
पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत
सुरेश भोळे हे सलग तिसर्यांदा आमदार होत आहेत. आमदार भोळे यांचे भारतीय जनता पक्ष कार्यलयात जोषात स्वागत करण्यात आले. आमदार भोळे यांचे पक्ष कार्यालयात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात यांचे स्वागत करण्यात आले. आ. भोळे यांनी बाराव्या फेरी अखेर 66 हजार 790 मतांची आघाडी घेतली आहे. एकूण 19 फेर्या होणार असून आता केवळ 7 फेर्या शिल्लक आहेत. त्यांच्या विरोधात महा विकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन ह्या लढत देत आहेत.
जनतेने दिली पुन्हा काम करण्याची संधी
दरम्यान, आमदार भोळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले की, मी 25 वर्षांपासून राजकारणात असून मागील 10 वर्षांपासून आमदार म्हणून काम करत आहे. या दहा वर्षांत 100 टक्के कामे झाल्याचा आम्ही दावा केलेला नाही. 75 टक्के कामे झाले असून 25 टक्के कामे ही प्रगतीपथावर आहेत. जनतेला आम्हाला पुन्हा सेवा करण्याची संधी यामुळे त्यांचे मी आभारी आहे.