मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झालीय. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अमित ठाकरे यांना दोन-तीन दिवसांपासून सर्दी आणि ताप जाणवत होता. त्यानंतर त्यांची काल चाचणी करण्यात आली. आज दुपारी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतर कुणालाही कोरोनाची लक्षणे नाहीत. राज ठाकरेंच्या कुटुंबातील इतरांची चाचणी निगेटिव्ह आल्याचीही माहिती मिळालीय.
याआधी सुद्धा ऑक्टोबर २०२० मध्ये अमित ठाकरे यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, अमित ठाकरे यांची कोरोनाची चाचणी ही निगेटीव्ह आली होती. व्हायरल फिव्हर झाल्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तर दुसरीकडे मागील आठवड्यात राज ठाकरे यांना सुद्धा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. राज ठाकरे यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.