नाशिक (वृत्तसंस्था) समृद्धी महामार्गावर गोंदे येथील टोलक्यावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवल्याची माहिती मिळताच संतप्त मनसैनिकांनी टोल नाक्यावर तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि. 23) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.
मागील ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नंदूरबार, धुळे, जळगाव याठिकाणी त्यांनी मेळावे घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अमित ठाकरेंचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार अडवण्यात आली.
काही काळ अमित ठाकरेंना तिथे उभेदेखील राहावे लागले. फास्टटॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याची माहिती आहे. त्यांनी ओळख देऊनही टोलनाका प्रशासनाने आर्धा तास थांबून ठेवले. टोल नाक्यावरून वाहन सोडले गेले नाही. सुमारे अर्धा तास त्यांचे वाहन कर्मचाऱ्यांनी रोखून धरले. अरेरावीची भाषा केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यावेळी अमित ठाकरे यांच्या समवेत कुणी पदाधिकारी नव्हते. टोल उतरून संगमनेरकडे रवाना झाल्यानंतर मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सिन्नर आणि नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती कळवली.
मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे व कार्यकर्त्यांनी रात्री सिन्नर तालुक्यातील समृध्दी महामार्गावरील तो टोलनाका गाठला. लाठा-काठ्यांनी तोडफोड करीत घोषणाबाजी केली.टोलनाक्याच्या केबिनच्या काचा फोडल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, अशा घोषणा देत हातातील दांडक्याने केबिनच्या काचा फोडून मनसैनिक तेथून पसार झाले.