नवी दिल्ली प्रतिनिधी । आज बिहारमध्ये एका पुलासह १२ रेल्वे योजनांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विश्वकर्मा दिनाच्या मुहुर्तावर शेतीसंबंधीची तीन विधेयके लोकसभेत पारित झाली आहेत. या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी अधिकचे पर्याय उपलब्ध होतीत. ही विधेयके पारित झाल्याबद्दल मी देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन करतो. ही विधेयके शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना दलालांपासून वाचवण्यासाठी आणण्यात आली आहेत. शेतीसंबंधीच्या या विधेयकांमुळे शेतकरी सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वत:चे पीक स्वत: विकून कमाई वाढवू शकेल, असे ही मोदी म्हणाले आहेत.
काही लोक अनेक दशके देशाच्या सत्तेत राहिले. त्यांनी देशावर राज्य केले. तेच लोक आज या विषयावरून शेतकऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना खोटेनाटे सांगत आहेत. निवडणुकांच्या वेळी हे लोक शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देत होते. आपल्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करत होते. मात्र निवडणुका झाल्यावर सर्व काही विसरत होते. आता त्याच गोष्ठींची पूर्तता एनडीएचे सरकार करत आहे. तर या मंडळींडून तऱ्हेतऱ्हेच्या अफवा पसरवत आहेत, असा आरोप मोदींनी केला. ज्या एपीएमसी कायद्यावरून हे लोक राजकारण करत आहेत. कृषी बाजारपेठेबाबतच्या तरतुदींमधील बदलांना विरोध करत आहेत. त्याच बदलांचे आश्वासन या मंडळींना आपल्या जाहीरनाम्यामधून दिले होते. मात्र आता एनडीएच्या सरकारने हे बदल केले तर यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिली जाणार नाही, शेतकऱ्यांकडून भात, गहू खरेदी केली जाणार नाही, असा दावा केला जात आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांना किमान हमीभावाच्या माध्यमातून योग्य मूल्य देण्यासाठी कटीबद्ध आहे, तसेच सरकारकडून खरेदी पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असे मोदींनी सांगितले.
केंद्र सरकारने काल लोकसभेमध्ये पारित करून घेतलेल्या शेतीसंबंधीच्या तीन विधेयकांमुळे सध्या वातावरण तापले असून, या विधेयकांना तीव्र विरोध होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपाचा जुना मित्रपक्ष असलेल्या अकाली दलानेही या विधेयकांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विधेयकांना विरोध करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. काही लोक दलालांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला मोदींनी लगावला आहे.