नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो छापण्यात येणार नाही. या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचे छायाचित्र हटवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. देशात कोरोना महामारीचं संकट अद्यापही आहे, त्या पार्श्वभूमीवर १५ जानेवारीपर्यंत रैली, सभा, कॉर्नर सभांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोविड नियमांचे पालन करूनच ही निवडणूक होणार असल्याचंही आयोगाने म्हटले आहे. त्यामुळेच, निवडणुकांपूर्वी सध्या वेगाने लसीकरण पूर्ण करायचं आहे. मात्र, आता ज्या ५ राज्यांत निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्या राज्यातील लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापला जाणार नाही. निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो गायब करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली असून कोविन अॅपवर एक फिल्टरही लावण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, ५ राज्यांत ७ टप्प्यात मतदान होत असून १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात होत आहे. तर, १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.