जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेचे भांगार साहित्य व पाईप चोरी प्रकरणात अटकेत असलेल्या सादीक खाटीक याने हे साहित्य मालेगावातील भंगार व्यावसायीक मोहम्मद आसम मोहम्मद आमीन यांना विक्री केल्याचे उघड झाले. त्यानुसार चौकशीत मालेगावातील व्यापाऱ्याकडून तालुका पोलिसांनी दोन लाखांची रोकड जप्त केली आहे. तसेच भंगार साहित्य विक्रीच्या पैशांचे व्यवहार हे महाजनांचा मामेभाऊ निरंजन पाटील यांच्या खात्यावरुन झाल्याचे देखील आता पोलिसांच्या तपासात उघड होवू लागले आहे.
शहरतील गिरणा पंपिंग प्लॉटमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाईप जेसीबीद्वारे काढून चोरी करीत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर भंगारसाहित्य व पाईप चोरीचेप्रकरण उजेडात आले. अटकेतील भंगारचा ठेकेदार सादीक बिसमिल्ला खाटीक याची चौकशी सुरु असून त्याने भंगारसह इतर साहित्य मालेगावातील भंगार व्यावसायिकाला विकल्याचे सांगितले, त्या व्यापाऱ्याने देखील त्याची विल्हेवाट लावल्याने त्याच्याकडे साहित्य शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे ते जप्त करणे शक्य नसल्याने साहित्य विक्रीतून आलेले दोन लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.
मनपाने भंगार साहित्य संकलनाचा ठेका चंदामुत एन्टरप्राईजेस कंपनीला दिला होता. माजी विरोधीपक्ष नेते सुनिल महाजन यांनी ठेक्याच्या दहा टक्के रक्कम देवून हा ठेका घेतल्याचे कंत्राटदाराच्या जबाबातून समोर आले. तसेच भंगार साहित्य संकलनाचे काम सादीक खाटीक हा करीत होता. मात्र या ठेक्याच्या निविदेमध्ये नमूद साहित्यापेक्षा अधिकचे साहित्य खाटीक याने काढल्याचे तपासात समोर येवू लागले आहे.
भंगार साहित्य संकलन केल्यानंतर ते साहित्य सादीक खाटीक याने मालेगाव व अकोल्यातील व्यापाऱ्याला विकल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. त्यानुसार तालुका पोलिसांनी अकोला येथील व्यापाऱ्याला चौकशीसाठी बोलवले होते. मात्र त्याच्या कौटुंबिक कारणामुळे त्याला चौकशीसाठी आणता आले नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये त्याला बोलविले असून त्याची देखील चौकशी केली जाणार आहे. रामानंद नगर पोलिसांच्या कोठडीत असलेला अक्षय अग्रवाल व भावेश पाटीलची चौकशीत ते एकमेकांचे नाव सांगत आहे. त्यामुळे तालुका पोलीस अग्रवाल याला ताब्यात घेवून त्यांची समोरासमोर चौकशी करणार आहे.
मालेगावातील व्यापाऱ्यासोबत झाला १५ लाखांचा व्यवहार
टेंडर मिळालेल्या कंपनीकडून काम घ्यायचे असल्याने सुनिल महाजनांचा निकटवर्तीय असलेल्या सादीक खाटीक याने सुमारे ४२ लाख रुपये भरल्याची माहिती समोर येत आहे. ठेकेदार खाटीक आणि मालेगावातील व्यापारी मो. आसम मो. आमीन यांच्यात सुमारे १५ लाख १८ हजार रुपयांचा व्यवहार झाला आहे. तर खाटीक आणि सुनिल महाजन यांचा मामेभाऊ यांच्यामध्ये सुमारे १२ लाख रुपयांचे ट्रान्ड्रॉक्शन झाल्याची माहिती आता समोर येवू लागली आहे.
संशयित सादीकने जळगावच्या एका कंपनीमधून घेतली मशिनरी
या प्रकरणातील संशयित सादीक खाटीक हा शहरातील कंपन्यांमधील भंगार घेण्याचे काम करीत असतो. परंतु एका कापड उद्योग क्षेत्रातील बहुचर्चित कंपनीमधून आस्थापनाला व एका पुढाऱ्याला हाताशी धरुन चढ्या भावाने मशिनरी घेतली. त्या मशिनरी सुस्थिती असतानादेखील भंगारच्या भावात खरेदी केल्या. या प्रकरणाचा सुगावा पोलिसांना लागला असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. त्यामुळे सादीकच्या कारनाम्याचे अनेक प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे.
फरार संशयितांचा घेतला जातोय कसून शोध
चोरी प्रकरणात पसार असलेले संशयित सुनिल सुपडू महाजन, अमिन राठोड, कुंदन पाटील, निरंजन पाटील यांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. पथक त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना देखील अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.