नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पावसाची शेतकरी आतुरतेनं वाट पाहात असतो. तो मान्सून अखेर दाखल झाला आहे. अंदामानात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे येत्या १ जूनपर्यंत हा मान्सून (Monsoon) केरळमध्ये (Kerala) दाखल होणार आहे. यंदाच्या वर्षी एक आठवडा अगोदरच पावसाला (Rain) सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १ जूनला पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातही पुढील 5 दिवस द. कोकण, द. मध्य महाराष्ट्र आणि द. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये गडगडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या देशाच्या अनेक भागात उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना त्रास होत आहे. अशात येणाऱ्या मान्सूनमुळे तापमानातही घट होईल.
त्याचप्रमाणे नैऋत्य मान्सून द.बंगालच्या उपसागराच्या काही भागात, अंदमान निकोबार बेटांचा बहुतांश भाग आणि अंदमान समुद्रात आज 16 मे ला पुढे सरकला आहे. त्यामुळे पुढील 4-5 दिवसांत केरळ किनारपट्टी आणि द. आतील कर्नाटक, आसाम, मेघालय तसेच अरुणाचल प्रदेशात मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत तापमान हे ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे तर विदर्भातही प्रचंड उकाडा आहे. अशात मान्सूनच्या आगमनाने तापमानात घट होऊन दिलासा मिळणार आहे.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
यंदा मान्सून लवकर दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.