औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद हॉकीपटू रोहन वडमारे आणि रोहित वडमारे हे महाराष्ट्राचे राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करत असून या दोघांचा सोमवारी तलावात बुडून मृत्यु झाला आहे. ही दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यात घडली असून या दुर्दैवी घटनेमुळे क्रीडा जगात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रोहन वडमारे व रोहित वडमारे हे दोन दिवसांपूर्वीच आजोळी म्हणजेच लातूर जिल्ह्यातील अहमदनगर तालुक्यातील एका गावात गेले होते. गावाजवळील तलावात ते पोहण्यासाठी गेले होते. रोहित वडमारे हा पाण्यात बुडत असल्याचे रोहन वडमारेच्या लक्षात आले. रोहन हा रोहितला वाचवण्यासाठी धावून गेला. परंतु, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो देखील पाण्यात बुडाला. या दोघांसह गावातील आणखी एका मुलाचाही बुडून मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर हॉकी खेळलेल्या प्रियांका व प्रीती वडमारे यांचे रोहन व रोहित हे भाऊ. मुकुंदवाडी परिसरातील प्रकाशनगर भागात ज्ञानदीप विद्यालयाच्या हॉकी संघाकडून त्यांनी अनेक वर्षे मैदान गाजवले होते. ज्ञानदीप विद्यालयाताच त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले होते.
मागील वर्षी रोहन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हॉकी संघाकडून खेळला होता. रोहित हा यंदाच दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्यांना हॉकी प्रशिक्षक शामसुंदर भालेराव यांनी प्रशिक्षण दिले होते. महाराष्ट्र हॉकी संघटनेचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, जिल्हा हॉकी संघटनेसह अन्य क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या दुर्देवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.