पुणे (वृत्तसंस्था) भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीहून परतल्यानंतर उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्यांनी आपली कोविड टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये मागील चार दिवसांपासून उपचार सुरु आहेत.
खासदार उदयनराजे यांच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले या सुरुवातीला कोरोनाबाधित झाल्या होत्या. त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मातोश्री कल्पनाराजेंना रुग्णालयात दाखल केल्याचे समजल्याने खासदार उदयनराजे दिल्लीहून अधिवेशन सोडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पुण्यात आले होते.
यावेळी संपर्कात आल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला होता व काही लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आत्ता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले. तसेच, पुढील एकदोन दिवसात त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असे देखील त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. तर त्यांच्या मातोश्रींनाही घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.
















