धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा धरणगावात साधी एक मुतारी ही न बांधू शकणाऱ्या खासदार उमेश पाटील यांनाच उलट थोडीफार वाटली पाहिजे, असे सणसणीत प्रतीउत्तर युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी खा. उमेश पाटील यांना दिले आहे.
विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील रविवारपासून संप पुकारला आहे. चाळीसगाव येथे आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी खा. उन्मेष पाटील यांनी भेट दिली होती. यावेळी खासदार उमेश पाटील यांनी पालकमंत्री तुम्ही कव्वाली म्हणता, पैसे उडवता. अरे कुठेतरी वाटली पाहिजे. माझ्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवत नाही. नाही सोडवला तर मी राजीनामा देईल असे म्हटले पाहिजे होते, असा टोला लगावला होता.
यावर आता शिवसेनेचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ यांनी खासदार उमेश पाटील यांना प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. परंतु ज्यांना संपूर्ण मतदारसंघात ‘मिस्टर इंडिया’ म्हणून संबोधले जाते, अशा कायम बेपत्ता असणाऱ्या खासदाराने फक्त टीका करू नये. मतदारसंघात विकासाची कामे देखील करावीत. खासदार महोदयांनी आतापर्यंत धरणगावात साधी एक मुतारी देखील बांधली आहे का? या प्रश्नाचे उत्तर आधी द्यावे. यापुढे खा. पाटील यांनी बोलताना त्यांनी भान ठेवावे. अन्यथा त्यांच्यापेक्षा खालचा भाषेचा वापर आम्हालाही करता येतो हे लक्षात ठेवावे, असा इशारा योगेश वाघ यांनी दिला आहे. तसेच खासदार पाटील यांनी वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन पंतप्रधान मोदी यांच्यावर देखील याच भाषेत टीका करून दाखविण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान देखील श्री.वाघ यांनी दिले आहे.