जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड रुग्णालयांसह सर्व अत्यावश्यक सेवा तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी जळगाव परिमंडलात महावितरणचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी अविरतपणे कर्तव्य बजावत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासकीय तसेच खाजगी रुग्णालये, कोव्हीडचे विशेष कक्ष, विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन प्लांट याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अत्यावशक सेवांना अखंडित वीजपुरवठा होईल याची विशेष खबरदारी महावितरणकडून घेतली जात आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेसाठी तात्काळ नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया महावितरणकडून राबवली जात आहे.
लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घरी बसणे तसेच शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुरळीत वीजपुरवठ्यामुळेच शक्य होत आहे. त्यातच आता दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. सर्वच नागरिक घरी असल्याने टिव्हीसह विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विविध कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेऊन तो पूर्ववत करत आहेत. कोरोनाच्या संकटातही महावितरणचे कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.
खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात महावितरणचे अभियंते, तंत्रज्ञ, यंत्रचालक व बाह्यस्रोत कर्मचारी सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये अविरत काम करत आहेत. यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या साह्यासाठी व्यवस्थापनातील अतांत्रिक अधिकारी कर्मचारीही सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या आपत्तीत कर्तव्य बजावताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यातून बरे होऊन अनेकजण कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दुर्दैवाने काही कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाला. मात्र तरीही कोरोनाच्या संकटाला न डगमगता सामोरे जात खान्देशातील महावितरणचे कर्मचारी ग्राहकांच्या सेवेसाठी अखंड राबत आहेत.