जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीचा धक्का लागून झालेल्या वादातून एम. जे. कॉलेजमध्ये मुकेश मधुकर सपकाळे (रा. असोदा) या तरुणावर चाकूने वार करुन त्याचा निर्घृण खून केल्याची घटना दि. २९ जून २०१९ मध्ये घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयाने खून करणाऱ्या किरण अशोक हटकर (वय २४, रा. नेहरुनगर) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर त्याच्या पाच साथीदारांची निर्दोष मुक्तता केली.
नेमकं काय घडलं होतं ?
जळगाव तालुक्यातील असोदा येथील रोहीम मधुकर सपकाळे हा तरुण दि. २९ जून २०१९ रोजी दुचाकीने एम. जे. कॉलेजमध्ये गेला होता. त्याच्या पुढे ट्रिपलसीट चालणाऱ्या दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक दाबल्यामुळे रोहीतच्या दुचाकीचा त्यांना धक्का लागला. यावेळी दुचाकीस्वार तरुणांनी रोहीतसोबत वाद घालत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रोहीतने कॉलेजमध्ये असलेल्या आपला मोठा भाऊ मुकेश सपकाळे याला बोलावून घेतले. त्यांनी तरुणांची माफी देखी मागितली. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी पुन्हा रोहीत व मुकेश या भावंडांसोबत वाद घालित त्यांना मारहाण केली. या वादामध्ये किरण हटकर याने कंबरेला खोचलेला चाकूकाढून त्याने मुकेशच्या डोक्यावर व छातीवर वार करुन आरोपी तेथून पळून गेले होते. यामध्ये मुकेश गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयितांना अटक !
या गुन्ह्यात पोलिसांनी मुख्य आरोपी किरण अशोक हटकर (वय २४, रा. नेहरुनगर), ईच्छाराम पुंडलीक वाघोदे (वय २४, रा. समतानगर), अरुण बळीराम सोनवणे (वय २७, रा. समतानगर), मथुर अशोक माळी (वय २२), समीर शरद सोनार (वय २४, रा. फॉरेस्ट कॉलनी), तुषार प्रदीप नारखेडे (वय २३, रा. यशवंत नगर) यांना अटक केली होती. न्यायालयात दोषारोप पत्र सादर केल्यानंतर हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात चालविण्यात आला.
एकाला जन्मठेप तर पाच जणांची निर्दोष मुक्तता !
बुधवारी दुपारी न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात कामकाज झाल्यानंतर किरण अशोक हटकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर त्याच्यासोबत असलेल्या इच्छाराम वाघोदे, अरुण सोनवणे, मयुर माळी, समीर सोनार, तुषार नारखेडे या पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. या गुन्ह्याचे तपास अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांनी काम पाहिले. सरकारपक्षातर्फे अॅड. सुरेंद्र काबरा यांनी तर पैरी अधिकारी तुषार मिस्तरी व नरेंद्र मोरे, पो. कॉ. इकबाल पिंजारी यांनी तर आरोपीतर्फे अँड. प्रकाश बी. पाटील यांनी कामकाज पाहिले. बुधवारी या खटल्याचे कामकाज सुरु असतांना न्यायालयाच्या बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. न्यायालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
युक्तीवादासह पुराव्यांवरुन धरले दोषी !
न्यायालयात कामकाज सुरु असतांना सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी २५ पानांचा लेखी व तोंडी युक्तीवाद करीत उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले होते. त्यांनी केलेल्या प्रभावी युक्तीवादासह आरोपीने गुन्ह्यात वापरलेला चाकू, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल यासह रोहीत सपकाळे याने आरोपीला ओळखल्याने हे पुरावे ग्राह्य धरुन संशयित किरण हटकर याला न्यायालयाने दोषी ठरविले होते.
३० जणांची साक्ष ठरली महत्वपूर्ण !
न्यायालयाने फिर्यादी रोहीत सपकाळे याच्यासह शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी व पंचांसह ३० जणांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. तसेच खून केल्यानंतर आरोपी किरण हटकर हा मोहाडी रोडकडे पळून गेला होता. त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू आरटीओ पासिंग टेस्टिंग ट्रॅकजवळ असलेल्या विहरीत फेकून दिला होता. पोलिसांनी विहरीतील पाणी उपसून तो चाकू हस्तगत केला होता.