मुंबई (वृत्तसंस्था) चार दिवसांपूर्वी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर काल मुंबईमध्ये आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे.
अटक करण्यात आलेले दहशतवादी इतर ठिकाणांव्यतिरिक्त मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये स्फोट घडवण्याचा कट आखत होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याविषयी गुप्तचर माहिती मिळाली आहे. या माहितीच्या आधारे दहशतवाद्यांनी लोकल ट्रेनवर गॅस हल्ला किंवा गर्दी असलेल्या रेल्वे स्थानकावर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचं षडयंत्र आखलं आहे. तसंच रेल्वे पोलिसांना विविध एजन्सींकडून नवीन धमक्या येत असून त्याआधारे ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद म्हणाले की, ”आम्हाला वारंवार दहशतवादाच्या धमक्या येत आहेत. विशेषत: लोकल ट्रेनसाठी आलेली धमकी तसंच आम्ही प्रत्येक धमकी गंभीरपणे घेतली गेली आहे. आम्ही आलेल्या धमक्यांवर विशेष लक्ष देऊन विविध पावले उचलत आहोत.”
दरम्यान, दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी पार पडलेल्या बैठकीत अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याचं ठरवण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी एक मॉडल तयार करण्यात येणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.