जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील जांभळी येथील मागील ४० दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मित्रानेच खून केल्याचे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहे. आरोपीने खुनाची कबुली दिलीय अगदी खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड, मयताचे कपडेही पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतू मृतदेह नेमका कुठं?, त्याची विल्हेवाट कशी आणि कुठं लावली?, याबाबत मात्र, आरोपी बोलायला तयार नाहीय. त्यामुळे मयताचा मृतदेह शोधण्याचे मोठे आव्हान जळगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. कैलास विठोबा वडाळे (वय ४९, रा. जांभळी ता. जामनेर) असे मयताचे नाव आहे. तर ४० दिवसांनंतर अटक केलेल्या रमेश संपत मोरे (वय ५४, रा.वडाळी ता.जामनेर) असे आरोपीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं !
या संदर्भात अधिक असे की, जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील रहिवासी कैलास विठोबा वडाळे १३ मे रोजी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता झाले होते. परिवारातील लोकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे मुलगा अविनाशने १४ मे रोजी पहूर पोलीस स्टेशनमध्ये वडील कैलास वडाळे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पहूर पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांचा कुठंही शोध लागला नाही. एक-एक करीत महिना उलटून गेला. पण कुठलीच माहिती हाती लगत नव्हती. शेवटी कैलास वडाळे यांच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेतली आणि सर्व हकीगत सांगितली. पोलीस अधीक्षकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला करण्याचे आदेश दिले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांनी कर्मचाऱ्यांचे पथक कामाला लावले.
एलसीबीने तपासचक्र फिरवायला सुरुवात करताच समोर आली धक्कादायक माहिती !
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरवायला सुरुवात केली. त्यानुसार गावातून माहिती मिळाली की, कैलास वडाळे यांची रमेश संपत मोरे यांच्यासोबत घट्ट मैत्री होती. परंतू मित्र बेपत्ता झाल्यानंतरही रमेश याने कधीही कैलास यांच्या परिवाराशी संपर्क केला नाही. अगदी कुटुंबाकडे साधी विचारपूससुद्धा केली नव्हती. तसेच मयत कैलास यांच्यासोबत शेवटी त्यालाच बघण्यात आले, असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचा धागा सापडला. यानंतर दोनच दिवसात २० जूनला स्थानिक गुन्हे शाखेने रमेश मोरे याला अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने कैलास वडाळे यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांना घटनास्थळ दाखवले. घटनास्थळी मयताचे कपडे, मोबाईल व इतर वस्तू सापडल्या. मात्र कैलास वडाळे यांचा मृतदेह मिळाला नाही.
मद्यप्राशन केल्यावर उफाळून आला वाद !
१३ मे रोजी रमेश व कैलास दोघांनी जांभूळ गावाजवळ एका शेतात बसून सोबत रात्री मद्यप्राशन केले. याचदरम्यान रमेश आणि कैलास यांच्यात वाद झाला. या वादातून रमेश याने कुऱ्हाडीने कैलास यांच्यावर वार केला, त्यानंतर दगड मारला. यात कैलास यांचा मृत्यू झाल्याची कबुली रमेशने पोलिसांकडे दिली. तर मुलगा अविनाश याने दिलेल्या फिर्यादीत रमेश मोरे याने वडिलांकडून २० हजार उसने घेतले होते, असे म्हटले आहे. मात्र हत्येच्या नेमक्या कारणाचा खुलासा झालेला नाही. या प्रकरणात आणखीही संशयितांची चौकशी सुरु आहे.
खून कबुली मात्र, मृतदेहाची माहिती देईना !
रमेशने कैलास यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना मयत कैलास यांचा मोबाईल, बुट, आधार कार्ड, पावत्या, पँन्टचे कापड, रूमाल आणि कुऱ्हाड असे साहित्य सापडले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेला रमेश हा कैलास यांच्या मृतदेहाबाबत कुठलीही माहिती पोलिसांना देत नाहीए. पोलिसांनी सर्व पद्धतीने त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेहाची विल्हेवाट कुठे लावली, मृतदेह कुठे आहे, याबाबत रमेश काहीच बोलायला तयार नाही.
पोलिसांकडून तोरनाळा जंगलात शोध !
कैलास यांचा मृतदेह शोधण्यासाठी एलसीबी पथक व पहूर पोलीसांनी रमेशला दिवसभर घेऊन घटनास्थळ शोधले. तोरनाळा ता. जामनेर येथे मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलिसांना सांगितले. त्याप्रमाणे रात्री पोलिसांनी तोरनाळा जंगल पिंजून काढले. परंतू मृतदेह आढळून आला नाही. त्यामुळे कैलास यांच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी आणि कुठं लावली?, हे शोधून काढण्याचे जळगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.