अमरावती (वृत्तसंस्था) तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या एका तरुणाची कोंडेश्वर परिसरात चाकूने अनेक वार करून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अंकुश संतोष मेश्राम (वय २२ रा. म्हाडा कॉलनी, असे मृतकाचे नाव आहे.
अंकुश हा बुधवार, ६ सप्टेंबरपासून घरून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी अंकुश हरविल्याची तक्रार खोलापुरी गेट ठाण्यात दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अशात शुक्रवारी रात्री कोंडेश्वर परिसरात अंकुशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर चाकूचे अनेक वार दिसून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे.