नागपूर (वृत्तसंस्था) पत्नीने पतीच्या डोक्यात दगडाने वार करीत खून केल्याची खळबळजनक घटना कामठी गुमथळा मार्गावरील आवंडी येथे रविवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी करून पत्नीनेच खून केल्याचे समोर आणले. आनंद भदू पाटील (४५, रा. आवंढी, ता. कामठी) असे मृताचे, तर अरुणा आनंद पाटील (३८) असे आरोपी पत्नीचे नाव आहे.
नेमकं काय घडलं !
आनंद पाटील हा आवंडी येथे पत्नी अरुणा पाटील (३८) सोबत राहत होता. त्याला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. आनंद मातीगोट्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दररोज दारू पिऊन घरी यायचा. यामुळे आनंद व अरुणामध्ये नेहमी भांडण होत होते. शनिवारी रात्री देखील दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावर त्यांच्यात भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने पहाटे पाच वाजता अरुणाने पती आनंद झोपला असताना त्याच्या डोक्यावर दगडाने वार केले. यात आनंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
प्रकरण दडपण्यासाठी पत्नीने दिली पती बेपत्ता असल्याची तक्रार !
पतीचा खून केल्यानंतर अरुणाने कोणाला काहीही न सांगता घराला कुलूप लावले. रविवारी सायंकाळी चार वाजता नवीन कामठी पोलीस ठाण्यात तिने पती हरविल्याची तक्रार दाखल केली. अरुणाच्या वागण्यावर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. यानंतर तिने पती आनंद पाटीलचा डोक्यावर दगड घालून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी पत्नीला रात्री अटक केली, या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दीपक पवार करीत आहेत.
झोपेतच केले दगडाने वार !
आनंद शनिवारी (दि. ३०) रात्री दारू पिऊन घरी आल्याने त्याचे पत्नीसोबत भांडण झाले होते. नंतर तो झोपी गेला. मात्र, त्याची पत्नी रात्रभर जागीच होती. पहाटे तो गाढ झोपेत असताना तिने त्याच्या डोक्यावर दगडाने वार केले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा झोपेतच मृत्यू झाला. त्यानंतर ती घराला कुलूप लावून निघून गेली.