भुसावळ प्रतिनिधी । येथील पापानगर मधील एका ६० वर्षीय अंध वृध्द हिंदु व्यक्तीचा आज (दि.२४ सप्टेंबर) गुरूवार रोजी सकाळी ११-३० वाजता निधन झाले. गेल्या ४० वर्षांपासुन या मुस्लीम बहूल वस्तीत राहत असलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला कुणीही नातेवाईक न आल्याने मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन तापीनदी काठावर हिंदु पध्दतीने अंत्यसंस्कार केले. या अनोखा कार्याचा सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पापानगरात सुरेश (बाळूभाऊ) निर्भर देशमुख हे पत्नीसह गेल्या ४० वर्षांपासुन या मुस्लीम बहूल परिसरात राहतात. अनेक वर्षांपासुन त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे त्यांची पत्नी प्रतिभा देशमुख ह्या मोलकरीणचे काम करून संसार चालवतात. आज त्यांचे पती सुरेश देशमुख यांचे निधन झाल्याने अंत्यसंस्कारासाठी कुणीही नातेवाइक न आल्याने त्यांची अडचण वाढली होती. मात्र माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू, शेख अमीन शेख अमीर, शेख सलमान शेख पापा, प्रकाश धोबी, राजू पाटील, शेख ईमरान शेख पापा यांच्यासह या भागातील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन पुर्ण तयारी करत तापी नदी काठावर त्यांच्या शेजारील शेख अमीन यांनी अग्नीडाग देऊन देशात हिंदू-मुस्लीम एकत्र असल्याचा संदेश दिला.
नगरसेवक शेख पापा म्हणाले कि, मयत बाळूभाऊ आमच्या भागात अनेक वर्षांपासुन राहतात व या भागात जातियवाद चालत नाही.कोरोना मुळे काही लोक अंत्यसंस्कार साठी सुध्दा जात नाही हे दुर्दैव आहे.आजही जातीधर्माला कुठलाही थारा नाही मात्र काही जातियवादी नेते हे एकमेकांना लढवतात असे त्यांनी स्पष्ट केले.