जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून दि. 15 सप्टेंबर, 2020 पासून “ माझे कुटूंब, माझी जबाबदारी” अभियानाची सुरुवात होत आहे. या अभियानाच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून दि. 12 ते 15 सप्टेंबर, 2020 या कालावधीत जळगाव जिल्हयातील 50 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तीचे सखोल आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्य सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागात गाव पातळीवर व नागरी भागात प्रभाग पातळीवर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. यात शासनाच्या विविध विभागांचे कर्मचारी विविध सामाजिक संस्थांचे सदस्य यांचा समावेश आहे. नियुक्त पथके घरोघरी भेट देवुन 50 पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणार आहे.
कोरोना या साथरोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्ण औषधोपचाराने बरा होतो. जिल्हयात सद्यस्थितीत 25 हजार 846 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. परंतु लक्षणांकडे व आजाराकडे दुर्लक्ष केल्यास रोग बळावतो व रुग्ण गंभीर अवस्थेत जावुन रुग्ण दगावण्याची शक्यता असते. जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, आपल्या घरी भेट देणा-या पथकांना सहकार्य करुन त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपुर्ण माहिती दयावी. आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासुन बचाव करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.