जळगाव (प्रतिनिधी) वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांच्या नावाने सुपारी व्यापाऱ्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी पोलिसांनी दोन हवाला व्यावसायिकांसह तिघांना नुकतीच अटक केली होती. नरेश परमार आणि रतन राणा (हवाला) तसेच संतोष मानधनिया अशी या तिघांची नावे आहेत. तर जळगावचा सौरभ केसवानी आणि नागपुरातील मद्यविक्रेते मनोज वंजानी (६१) तसेच अशोक वंजानी (वय ६५) हे या हायप्रोफाईल हवाला प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
सुपारी व्यापारी महेश चंद्र नागरिया याला 27 जानेवारीला पोलिसांनी अटक केली. हा व्यापारी जेलमध्ये होता. मात्र, इंदोर येथील त्याच्या भावाला दोन जणांनी फोन केला. तुझा भाऊ आता जेलमधून बाहेर येऊ शकत नाही. पण, त्याला बाहेर काढायचं असेल तर पोलिसातील वरिष्ठ अधिकारी आणि न्यायपालिकेतील वरिष्ठांशी संधान साधावं लागेल. तिथे आमची ओळख आहे. मात्र यासाठी 60 लाख रुपये तुला द्यावे लागतील. सौरभ केसवानी तुझं हे काम करून देईल, असे सांगत त्याच्याकडून 30 लाख रुपये खंडणी घेतली. ते पैसे हवालामार्फत (Hawala) पाठविण्यात आल्याचं पुढे आलं. मात्र इकडे महेश चंद्र नागरिया याला जामीन मिळाला. मात्र आरोपी उर्वरित पैसे मागत होता. मग हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहचलं. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अजून फरार आहे.
एक रुपयाची नोट फाडून त्याचे केले दोन तुकडे
वंजानीने त्यांचे हवाला करणारे साथीदार नरेश परमारला हे तीस लाख दिले. परमारने ही रोकड रतन राणाला दिली. त्याने एक रुपयाची नोट फाडून त्याचे दोन तुकडे केले. एक तुकडा ३० लाखांसोबत सूरत (गुजरात) मध्ये ब्रजेश पटेलकडे पोहचला. दुसरा एक रुपयाच्या फाटलेल्या नोटेचा तुकडा जळगावमध्ये सौरभ केसवानीकडे गेला. पटेलने ती रोकड चाळीसगावमध्ये संतोष मानधनियाकडे तर मानधनियाने सौरभ केसवानीकडे जळगावला पोहचवली.
रकमेचे किती हिस्से झाले आणि कोण कोण या हिस्सेवाटणीत सहभागी ?
केसवानीने ३० लाखांतील काही रक्कम स्वतःकडे ठेवून बाकी लाखोंची रक्कम वंजानीकडे पाठविली. वंजानीने त्या पोलीस कर्मचाऱ्यासह दलालाकडेही त्यांच्या हिस्स्याप्रमाणे रक्कम दिली. या रकमेचे किती हिस्से झाले आणि पोलीस कर्मचाऱ्यासह आणखी कोण कोण या हिस्सेवाटणीत सहभागी आहे?, त्याचा आता पोलीस आयुक्त अमितेशकुमार आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शोध घेत आहेत.
दहा-पंधरा आरोपी अडकण्याची शक्यता
या खंडणी प्रकरणात नागपूरच्या दोन पोलिसांची नावे समोर येत आहेत. त्यामुळं त्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाता जवळपास दहा ते पंधरा आरोपी अडकण्याची शक्यता आहे. जळगावचा सौरभ केसवानी हा हातात लागत नसल्याची माहिती आहे. गुन्हे शाखेने मंगळवारी वासन वाईन शॉपचे संचालक अशोक वंजानी याला ताब्यात घेतले. चाळीसगावचा हवाला कंपनीचा कर्मचारी संतोष मंधानालाही आधीच ताब्यात घेण्यात आलेले आहे. हवाला कंपनीचे कर्मचारी रतन राणा आणि नरेश परमार हे २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहेत.
केसवाणीची जळगावात मोबाईलची दुकानं ?
जळगावचा सौरभ केसवानी आणि नागपुरातील मद्यविक्रेते मनोज वंजानी तसेच अशोक वंजानी हे या हायप्रोफाईल खंडणी प्रकरणातील मास्टर माईंड असल्याचे समोर येत आहे. जळगावचा सौरभ बाबत जास्ती कुणाला माहिती नाहीय. सौरभची जळगावच्या गोलाणी मार्केटमध्ये मोबाईलची दुकानं असल्याची माहिती मिळत आहे. काही जणांच्या मते सौरभने या प्रकरणात काही टक्केवारीसाठी मध्यस्थी केली असेल. पण तो एवढा मोठा खिलाडी असू शकत नाही. तर काही जण पोलीस तपासातच खरं खोटं कळेल, असे देखील म्हणत आहेत. दरम्यान, जळगावचा सौरभ केसवानी आणि नागपुरातील मद्यविक्रेते मनोज वंजानी तसेच अशोक वंजानी हे या हायप्रोफाईल हवाला प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचे वृत्त ‘ऑनलाईन लोकमत’ मध्ये प्रकाशित झाले आहे.