नागपूर (वृत्तसंस्था) आपल्या जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या मुलाला नागपूर सत्र न्यायालयाने जन्मठेप तसंच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. ए. एम. देशमुख यांनी गुरुवारी हा निर्णय दिला. या प्रकरणामधील आरोपी ३२ वर्षाचा असून तो व्यवसायाने मजूर आहे.
आरोपी मुलगा हा ३२ वर्षाचा असून त्याचे लग्न झाले होते. परंतु, त्याच्या विकृत स्वभावामुळे पत्नीला सासरी राहणे कठीण झाले. परिणामी, तिने या घटनेच्या तीन वर्षापूर्वी घटस्फोट घेतला. पीडित आई धुणीभांडी करून जीवन जगते. ती आरोपीचीही काळजी घेत होती. असे असताना २१ जून २०२१ रोजी मध्यरात्री आरोपीने ताळतंत्र सोडून आईवरच बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित बकतवार यांनी प्रकरणाचा तपास केला. न्यायालयात सरकार पक्षाने आई आणि इतर साक्षीदारांचा जबाब आणि डीएनए अहवाल यावरून आरोपीवरील गुन्हा सिद्ध केला. सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले. नागपूरमधल्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
















