धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील तरूणाचा बिड जिल्ह्यातील बीड-परळी महामार्गावर अपघातात मृत्यू झाला आहे. सचिन आनंद भोळे (वय-३६, रा. नांदेड ता. धरणगाव ह.मु. पांढरी मंदीराजवळ नांदेड) असे मयत तरुणाचे नाव आहे.
सचिन आनंद भोळे हा तरुण टोलकाटे कंपनीत कामाला आहे. कामाच्या निमित्ताने सचिन जिल्ह्यात ऑर्डरप्रमाणे दुचाकीने व्हिजीट देण्याचे काम करत होता. ४ डिसेंबर रोजी साकाळी परळी जि. बीड येथे कामाच्या निमित्ताने गेला होता. काम आटोपून सायंकाळी ६ वाजता दुचाकी (एम.एच. ४१ एमएल १८६८) ने कामाहून घरी परतत असतांना परळी-बीड महामार्गावरील दिद्रुड गावाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात सचिनचा डोक्याला जबर मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मृतदेह धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे आणण्यात आले. रविवारी ५ डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.