नशिराबाद (प्रतिनिधी) येथील मुंबई- नागपूर महामार्गावरील टोलनाक्यावर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या पथकाने २१ जुलै रोजी अचानक छापा टाकला होता. त्यात वाहनधारकांना टोल नाक्यावर बनावट पावत्या देत फसवणूक होत असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी अखेर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी या बनावट पावत्यांसह फसवणूक होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत बनावट पावत्या देत वाहन चालकांची फसवणूक होत असल्याचे आढळून आले होते. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर देखील ‘न्हाई’चे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा अथवा त्यांचा कुणीही सहकारी या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यास पुढे आला नाही. अगदी ‘न्हाई’ या प्रकरणात अंग चोरण्याचेच काम केले. ‘न्हाई’चे प्रादेशिक अधिकारी राजीव अग्रवाल यांनी जळगावला येवून ज्याने तक्रार केली त्यानेच फिर्यादी व्हावे असे सांगून आपली जबाबदारी साफपणे झटकली होती. अखेर याप्रकरणात पोलिसच फिर्यादी झाले आहेत.
नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टोल नाक्यावरील जनरल मॅनेजर सेहवाल समशेर खान, अकाऊंटंट शिवदत्त पारीख, प्रदीप यादव, संतोष तिवारी, सिताराम यादव, शमीम खान, सवाईसिंग अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.न. 102 भा.द.वि. कलम 420, 465, 471, 120(ब) नुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे हे करीत आहेत.
















