जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय नाट्यपरिषद करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये जळगाव जिल्हा केंद्रावरील प्राथमिक फेरीत नाट्यरंग थिएटर्स, जळगावच्या ‘गाईड’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत, मुंबई येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीमध्ये प्रवेश प्राप्त केला आहे.
पंढरपूरला येणारा प्रत्येक भाविक हे आनंदी कसा असतो त्या आनंदाचा शोध घेत ते विठ्ठलाच्या दाराशी आलेले नास्तिक प्राध्यापकांना मंदिराच्याबाहेर फुलहार विकणारा मुलगा माऊली भेटतो. माऊलीचे बोलणं वागणं बघून ते त्याच्याशी मैत्री करतात. तो त्यांना विठ्ठलभक्तीचा महिमा सांगत हळूहळू त्यांना विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत घेऊन जातो. त्याच्या माहितीने ते त्याला स्वतःचा गाईड मार्गदर्शक मानतात, पंढरपूर वारी विठ्ठलभक्तीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व सांगणाऱ्या या संहितेचे लेखन व दिग्दर्शन अमोल ठाकूर यांनी केले होते.
सुहास दुसाने आणि अथर्व रंधे या कलावंतांनी साकारलेल्या अभिनयाने अध्यात्म आणि श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव उपस्थित नाट्यरसिकांना मिळाला.
नाट्यप्रयोगाला उपस्थित ज्येष्ठ रंगकर्मींनी एकांकिकेतील आशय, भक्तीभाव आणि सादरीकरणाच्या सौंदर्याचे कौतुक केले तर या एकांकिकेला विजेती ठरवून परीक्षक पियुष नाशिककर व उमेश घळसासी यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. या एकांकिकेला पियुष भुक्तार यांचे पार्श्वसंगीत लाभले होते, तर दिशा ठाकूर यांनी रंगभूषा व वेशभूषा केली होती. सुयोग राऊत आणि दर्शन गुजराथी यांनी रंगमंचाची उत्तम व्यवस्था सांभाळली होती.
नाट्यरंगच्या या यशाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, शंभू पाटील, प्रमुख कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, केंद्रप्रमुख तथा नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे, सहसमन्वयक पवन खंबायत यांनी अभिनंदन करत महाअंतिम फेरीतील सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.