मुंबई (वृत्तसंस्था) मनी लाँडरिंग प्रकरणात कारागृहात असलेल्या नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात गेला आहे. या प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये नवाब मलिक यांचा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर कोर्टाने सुद्धा मलिकांचे डी गँगसोबत संबंध (Nawab Malik – D gang relation) असल्याचं सकृतदर्शनी पुरावे असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे.
मुंबई विशेष न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. ईडीने मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल न्यायालयाने घेतली. मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी दाऊदच्या टोळीची थेट मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. ईडीने आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे आणि सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे सकृतदर्शनी असंच दिसत आहे की नवाब मलिकांचे दाऊद गँगशी थेट संबंध होते. दाऊदची बहीण हसीना पारकर आणि इतर दोन आरोपींसोबत नवाब मलिकांच्या वारंवार बैठका होत असत. गोवावाला कम्पाऊंड कशी हडप करायची, याचा कट रचला गेला होता. यासाठीची पाहणी करायला त्यांनी एक माणूसही नेमला होता, असं समोर आलं आहे.
गोवावाला कम्पाऊंडमध्ये असलेली मालमत्ता १९९२ च्या पुरानंतर बंद करण्यात आली होती. त्यावर नवाब मलिकांनी आपल्या काही माणसांच्या मदतीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. इथली मालमत्ता बळकावण्यासाठी नवाब मलिकांनी दाऊदच्या गँगची थेट मदत घेतल्याने सकृतदर्शनी पुरावे आढळले आहेत.