मुंबई (वृत्तसंस्था) आर्यन खान अटक प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका लावली आहे. आज सकाळी पुन्हा एकदा मलिक यांनी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या खोट्या प्रकरणाबद्दल पत्र लिहिले होते. आता हेच पत्र नवाब मलिक यांनी दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले आहे. तसेच या बेनामी पत्रातील आरोपांची चौकशी करावी अशी मागणीही मलिक यांनी या पत्राद्वारे केली आहे.
नवाब मलिक यांना दोन दिवसांपूर्वी हे पत्र मिळालं आहे, याची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजी तसंच काँग्रेसच्या अध्यक्षांनाही पाठवली आहे. एनसीबीच्या कार्यालयात एक ग्रुप तयार झाला असून खोटी प्रकरणं तयार केली जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक माहिती उघड होईल, असं मलिक यांनी म्हटलं आहे.
नेमकं ‘त्या’ पत्रात काय?
पत्र पाठवणारा एनसीबीचा कर्मचारी असल्याचा त्यात उल्लेख असून आपण गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत कार्यरत असल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना कोणत्याही मार्गाने बॉलिवूड कलाकारांना ड्रग्स प्रकरणात अडकवून त्यांच्याविरोधात केस तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर या कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली जात होती, त्यातला काही हिस्सा राकेश अस्थाना यांनाही दिला जात होता असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.
















