मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर एनसीबीने छापा टाकला असून, जावई समीर खान यांना एनसीबीकडून ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात जावयाला अटक करण्यात आल्यामुळे नवाब मलिक यांच्यासमोरच्याही अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे.
समीर खान याला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. ड्रग्ज तस्करीप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. करण सजनानीच्या ड्रग्ज कार्टेलमध्ये समीर खान यांनी पैसे गुंतविल्याचे एनसीबीच्या तपासात समोर आले आहे. तसेच, सजनानीतर्फे चालवल्या जात असलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये समीर खान अॅक्टिव्ह पार्टनर असल्याचेही सांगितले जात आहे. एनसीबीने केलेल्या तपासात ही माहिती समोर आल्यामुळे नवाब मलिक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी फक्त बॉलिवूडच नाही तर उद्योगपती आणि श्रीमंतांची नावे देखील समोर आली आहेत. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करन सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावं समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या तपासामध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली जात होती. मुंबईतील प्रसिद्ध पानवाला अशी ओळख असणारा मुच्छड पानवाला त्याचे पान फक्त मुंबईतच नाही तर जगातल्या अनेक ठिकाणी मागवले जातात. हायप्रोफाईल बिजनेसमॅनपासून बॉलिवूडच्या सेलिब्रेटीपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असणाऱ्या मुच्छड पानवालाची एनसीबी ड्रग्स प्रकरणात चौकशी करणार आहे.
जावई समीर खानला अटक झाल्यानंतर अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. “कोणीही कायद्यापेक्षा मोठा नसतो. कोणत्याही भेदभावाशिवाय हा नियम सगळ्यांना लागू झाला पाहिजे. कायदा त्याचं काम करेल आणि न्याय नक्की मिळेल. मला न्यायसंस्थेविषयी पूर्ण आदर आणि विश्वास आहे,” असे नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, एनसीबी या प्रकरणावर तपास करत असून आगामी काळात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.