मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या मित्रासह आठ जणांना एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. अशातच अरबाज मर्चंटने जामिनासाठी अर्ज केला असून घटनास्थळी एनसीबीनेच ड्रग्ज ठेवले असल्याचा खळबळजनक आरोप अरबाज मर्चंटने केला आहे.
अरबाज मर्चंटनं बुधवारी जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यासोबतच अरबाजनं मुंबई पोर्ट ट्रस्टमधील इंटरनॅशनल टर्मिनलच्या ग्रीन गेटवरचं CCTV फुटेज देण्याची देखील मागणी केली आहे. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३० मिनिटांपर्यंतचं सीसीटीव्ही फूटेज मिळावं, अशी मागणी अरबाज मर्चंटनं केली आहे. तसेच, सीआयएसएफनं त्याची एक कॉपी ठेवावी, असं देखील अरबाज मर्चंट म्हणाला आहे.
दरम्यान, अतिरिक्त न्यायदंडाधिकारी आर. एम. नारळीकर यांनी एनसीबीला सीसीटीव्ही फूटेजसंदर्भात नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. अरबाझ मर्चंटनं आपल्या याचिकेमध्ये म्हटलंय की, “सीसीटीव्हीमधून हे दिसून येईल की प्रवेश करताना माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाहीत आणि ते एनसीबीनंच तिथे प्लांट केले होते”.