मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केलाय. एनसीबीनं ८ लोकांना ताब्यात घेतलं असं सांगितलं होतं. पण एनसीबीनं ११ जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर तिघांना सोडण्यात आलं. त्यात रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, अमीर फर्निचरवाला या तिघांना सोडून देण्यात आलं. रिषभ सचदेवा यांचा भाजप नेत्यांशी संबंध असल्याचा खुलासा नवाब मलिक यांनी केला आहे.
आपल्या आरोपांसंदर्भातले पुरावे सादर करण्यासाठी नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक खुलासे केले. ते म्हणाले, एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितलं की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र खरं म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातल्या तिघांना सोडून देण्यात आलं आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचं नाव सुनावणीदरम्यान आलं आहे. या दोघांच्या बोलावण्यावरुनच आर्यन खान तिकडे गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकलात. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. मात्र ज्या तीन लोकांना तुम्ही सोडलं, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला.
या ड्रग्ज प्रकरणात ज्या तीन लोकांना सोडण्यात आलं, त्यापैकी एक भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा आरोप मलिक यांनी याआधीही केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचं नाव जाहीर केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजपा मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.
एनसीबीवर गंभीर आरोप
नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी म्हटलं होतं, शनिवारी एनसीबीने CISF कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून गौप्यस्फोट केला आहे. ‘आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले.