सिंधुदुर्ग (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या भाषणात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या त्यांनी केलेला विकासाबद्दल सांगितलं. इथे ज्या पायाभूत सुविधा तयार झाल्या, यासाठी कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचं नाव तिथे येऊच शकत नाही”, असं राणे यावेळी म्हणाले.
नारायण राणे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत केली. मात्र, पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. व्यासपीठावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री भेटले.. काहीतर कानाजवळ बोलले. मला एक शब्द ऐकू आला… असो… पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. ९० साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. ९० सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा, असं राणे आपल्या भाषणात म्हणाले.
उद्धवजी हे सर्व मी साहेबांच्या प्रेरणेतून आत्मसात केलं. त्यात माझा स्वार्थ नव्हता. मी छोटा-मोठा उद्योजकही आहे. सिंधुदुर्गाचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल याचा विचार मी केला. तेव्हा विमानतळाचा मुद्दा समोर आला. तेव्हा मी टाटाकडे गेलो. बाजूला गोवा आहे, तुम्हाला समुद्र लाभलाय. पर्यटनाच्या दृष्टीने पोषक जिल्हा आहे. ९५ ला युतीची सत्ता आली. मनोहर जोशींना मी सांगितलं की पर्यटन जिल्हा करु. तेव्हा केंद्राकडे परवानगी मागितली आणि देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग झाला.
सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना क्रेडीट टीमला द्यायचा. तसं माझं आहे. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला एक विनंती आहे. याच जागेवर मी व प्रभू साहेब भूमिपूजनासाठी आलो. त्यावेळी काही लोक समोर आंदोलन करत होते. विमानतळ नको म्हणत होते. मी नाव घेतलं तर राजकारण होईल. आमचं भागवा आणि रस्ता सुरु करा, अशी मागणी करायचे. रस्ता कोण अडवतं विचारा जरा, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेना नेत्यांवर टीकास्त्र डागलं.