मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनाही कोरोना चाचणी करण्याची विनंती केली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी नुकतंच राज्यभर परिवार संवाद यात्रा केली होती. याला जोरदार प्रतिसाद देखील मिळाला होता. तसेच परवा राष्ट्रवादी कार्यालयात त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात कोरोना विषाणूची ४७८७ नवीन प्रकरणे
राज्यात काल एकूण ४७८७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर्षीची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०,७६,०९३ वर पोहोचली आहे. अमरावतीत सर्वाधिक रुग्णांची वाढ झाली आहेत. अमरावतीत मंगळवारी ८२ रुग्ण आढळले होते बुधवारी त्यांची संख्या २३० वर पोहोचली होती.