किनगाव : सीमेवर देशाचे संरक्षण करीत असताना मुलगा शहीद झाल्यानंतर कुटुंबीयांना मिळालेले पैसे आईने स्वतःच्या बँक खात्यात ठेवले होते. सदर पैसे मामीच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन एका भाच्याने परस्पर उचलून १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी भाच्याविरोधात अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील मंगल भागवतराव चामे (वय ६०) यांच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले. त्यांचा मोठा मुलगा अशिक्षित आहे. त्याला व्यवहाराचे कसलेही ज्ञान नाही. महिलेचा दुसरा मुलगा सैनिक होता. तो मागील दीड वर्षापूर्वी देशसेवा करीत असताना शहीद झाला. त्याच्या नोकरीचा आलेला सर्व पैसा मंगल चामे यांनी त्यांच्या ठेवला नावावरील बँक खात्यात होता. फिर्यादी मंगल चामे यांच्या भावाचा मुलगा प्रवीण अनिल इरपतगिरे (वय २५, रा. वाटवडा ता. कळब जि. धाराशिव) हा चिखली येथे अधून- मधून येत होता. या भाच्याने मामीला विश्वासात घेऊन त्यांचे आर्थिक व्यवहार करण्यास मदत केली. मामी चेकबुक व पासबुक कुठे ठेवतात, याची माहिती घेतली.
मामी चेकबुकवर सही कशी करतात, ते पाहून मामीच्या घरात ठेवलेले एचडीएफसी बँकेचे व एसबीआय बँकेचे चेकबुक आरोपी प्रवीण इरपतगिरे याने चोरून नेले. त्यावर मामीची सही करून मामीच्या खात्यावरील रक्कम स्वतः च्या खात्यावर वळती केली. मामीचा मोबाईल विश्वासाने स्वतःकडे घेऊन मोबाईलच्या आधारे नेट बँकिंग सुरू केले. नेट बँकिंगच्या आधारे खात्यावरील रक्कम परस्पर स्वतःच्या खात्यावर व इतरांच्या खात्यांवर पाठविली.
एकूण १६ लाख ३ हजार ६३१ रुपये भाच्याने स्वतःच्या खात्यावर घेतले. यामुळे मामीची फसवणूक झाली. हे सर्व व्यवहार आरोपी प्रवीण याने दि.४ मार्च २०२१ ते दि. २६ डिसेंबर २०२२ दरम्यान केले आहेत. खात्यावरील पैशाची परस्पर विल्हेवाट लावल्याचे मामीला माहित झाले, तेव्हा प्रवीण इरपतगिरे याच्या मामी मंगल भागवतराव चामे या पैसे मागण्यासाठी गेल्या असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे मंगल भागवतराव चामे यांनी शनिवारी (दि.१) किनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भाच्चा प्रवीण अनिल इरपतगिरे याच्याविरुद्ध गु.र.नं.व कलम १५९ / २४ कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ५०६ कलमान्वये शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. तोटेवाड हे करीत आहेत