जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पहिल्यांदाच आज शहरात दाखल झाले. याअनुषंगाने सायंकाळी नवनिर्वाचीत महापौर सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची जळगावातील निवासस्थानी भेट घेऊन शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.
जळगाव महापालिकेतील भाजप सदस्यांचा २७ नगरसेवकांचा गट फुटला असून त्यांच्या मदतीनेच सौ. जयश्री सुनील महाजन व कुलभूषण पाटील यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी विजय संपादन केला आहे. या पार्श्वभूमिवर, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकनाथराव खडसे यांच्या सोबत शहराच्या विकासाबाबत चर्चा केली. याप्रसंगी खडसे यांनी त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही दिली.
















