वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीविरोधात अमेरिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहल मोदीने मॅनहॅटन येथील एका हिरे कंपनीसोबत मल्टी लेयर्ड स्कीमच्या माध्यमातून १९ कोटींपेक्षाही अधिक रक्कमेत हेराफेरी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हिऱ्यांच्या या कंपनीने नेहलवर २.६ दशलक्ष डॉलरहून अधिक मुल्यांचे हिरे खरेदी केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात ‘फर्स्ट डिग्री’ अंतर्गत चोरीचा आरोप लावला आहे. भारतातील बँकांना कोट्यवधींचा गंडा घालून पलायन केलेल्या हिरा व्यापारी नीरव मोदीच्या भावावरही अमेरिकन कंपनीला कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांच्या कंपन्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या अमेरिकेतील एका कंपनीला नेहाल मोदीनं गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. एका मल्टिलेअर्ड स्किमद्वारे त्यानं अमेरिकेतील कंपनीची २.६ दशलक्ष डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप नेहाल मोदीवर करण्यात आला आहे. शुक्रवारी न्यूयॉर्कमधील वकील वेन्स ज्युनिअर यांनी नेहाल मोदीविरोधात करण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिली. तसंच नेहाल मोदीला आता न्यायालयीन कारवाईचा सामना करावा लागणार असल्याचंही ते म्हणाले. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांवरून मार्च २०१५ ते ऑगस्ट २०१५ या कालावधीत नेहालनं चुकीच्या पद्धतीनं २.६ दशलक्ष डॉलर्सचे एलएलडी डायमंड्स युएसएकडून हिरे घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. मार्च २०१५ मध्ये नेहालनं पहिल्यांदा कंपनीला ८ लाख डॉलर्स किंमतीचे हिरे देण्यास सांगितले होते आणि ते हिरे कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशन नाव्याच्या कंपनीला विक्रीसाठी दाखवणार असल्याचं सांगितलं होतं. आपले सदस्य म्हणून जोडले जाणाऱ्या ग्राहकांना कॉस्टको कमी दरात हिऱ्यांची विक्री करते.
एलएलडीकडून हिरे मिळाल्यानंतर नेहालनं कंपनीला कॉस्टको ही कंपनी हिरे खरेदीसाठी तयार झाल्याचं म्हटलं. यानंतर एलएलडीनं त्याला हे हिरे उधारीवर दिले आणि ९० दिवसांच्या आत त्याचे पैसे देण्यास सांगितलं. परंतु त्यानंतर नेहालनं ते हिरे कोलॅट्रल लोन्सकडे तारण ठेवून त्यावर छोट्या कालावधीचं कर्ज घेतलं, असं डिस्ट्रीक्ट अॅटर्नी कार्यालयाकडून सांगण्यात आलं. एप्रिल ते मे २०१५ दरम्यान, नेहालनं कोस्टकोला विक्री करण्याचा दावा करत एलएलडीकडून तीन वेळा १० लाख डॉलर्स पेक्षा अधिक किंमतीचे हिरे घेतले. यावेळी त्यानं कंपनीला काही प्रमाणात रक्कम दिली. परंतु ती त्या हिऱ्यांच्या किंमतीपेक्षा कमी गोती. जोपर्यंत आपली फसवणूक झाल्याचं कंपनीला समजलं तोवर नेहालनं ते हिरे विकून मिळालेले पैसे खर्चदेखई केले होते. यानंतर एलएलडीनं मॅनहॅटन प्रॉसिक्युटर ऑफिसमध्ये त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
अमेरिकन कायद्यानुसार, एक दशलक्षाहून अधिक रक्कमेची चोरी, फसवणूक असेल तर फर्स्ट डिग्रीमध्ये गुन्हा नोंदवला जातो. मॅनहॅटन डिस्ट्रीक्ट अॅटर्नी सीव्हाय वेन्स ज्युनिअर यांनी सांगितले की, नेहल मोदीवर न्यूयॉर्कच्या सुप्रीम कोर्टात फर्स्ट डिग्रीमध्ये मोठ्या चोरीचा आरोप लावण्यात आला आहे. त्यामुळे आता नेहल मोदीवर न्यूयॉर्कमध्ये सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणामुळे नेहल मोदीच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे म्हटले जाते.