नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा करत अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात तब्बल २७८० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्याचे जाळे अधिक सक्षम होण्यास आता मदत होणार आहे. नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.
देशाच्या विकासासाठी पायाभूत आणि रस्ते विकास महत्त्वाचा असतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी तब्बल २,७८० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. नितीन गडकरी यांनी एकामागून एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. महाराष्ट्रातील या कामांसाठी २७८० कोटींहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरण करण्यासाठी मंजूर झालेल्या निधीसंदर्भात माहिती दिली.
राष्ट्रीय महामार्ग ७५२ आयवरील वातूर ते चारथाना दरम्यानच्या रस्त्याच्या काम करण्यासाठी २२८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच तिरोरा ते गोंदियादरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ७५३ च्या दोन पदरी रस्ते बांधकामासाठी २८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तारीरी- गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्ग १६६ जीवरील रस्त्याच्या कामासाठी १६७ कोटी रुपये, तिरोरा गोंदिया राज्य महामार्गाच्या गांधकामासाठी २८८.१३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, राष्ट्रीय महामार्ग ७५३ अंतर्गत २८.२ किमीचा नवा रस्ता बांधण्यात येणार आहे.