मुंबई (वृत्तसंस्था) क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, तसंच त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचं आढळून आले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन आदेश शनिवारी सार्वजनिक करण्यात आला.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्यावर NCB कडून कारवाई करण्यात आली होती. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यास जवळपास महिनाभर कोठडीत राहावे लागले होते. हायप्रोफाईल अशा या प्रकरणावरून राज्यात मोठे राजकारण तापले, ज्याची धग अजूनही जाणवतच आहे. या प्रकरणात ड्रगचे कट रचल्याचे कलम NCB कडून लावण्यात आले होते. पण, त्याबाबत पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आले नाहीत. त्यामुळे NCB च्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आर्यनच्या चॅटमध्ये अरबाज, मुनमून यांच्यात पार्टीबाबत ड्रग नेण्यासंदर्भात कोणतेही चॅट आढळून आले नाहीत. NCB आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्या कथित कबुली जबाबावर विसंबून राहू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, अशी विधाने पुराव्यात अमान्य आहेत असे मुंबई मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांच्यात ड्रगशी संबंधित गुन्हे करण्याचा कट रचल्याचा कोणताही सकारात्मक पुरावा नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही, जेणेकरुन संबंधित वेळी त्यांनी ड्रगचे सेवन केले होते की नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने जामीन आदेशात नोंदवले आहे. या तिघांविरोधात एनसीबीकडे ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे.
आज न्यायालयाने काय म्हटले?
आर्यन खानचा गुन्हा करण्याचा हेतू होता, असा कोणताही पुरावा नसल्याचे निरीक्षण यात नोंदवले आहे. त्याशिवाय या प्रकरणात एनसीबीने एनडीपीएसचे २९ कलम लावले होते. कट रचल्याबाबतचे हे कलम होते. ते योग्यरित्या लावले का हे आम्हाला तपासावे लागेल. तसेच या बाबतचे पुरावे आहेत का हेसुद्धा आम्हाला तपासावे लागेल.