भुसावळ (प्रतिनिधी) बहिणीशी प्रेमविवाह झाल्यानंतरही तिच्या मनाविरोधात दुसर्या महिलेशी प्रेमसंबंध ठेवल्याने व या संबंधामुळे कुटूंबात वितुष्ट निर्माण झाल्याने कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा त्याचा शालक निलेश ठाकूरने तब्बल चाकूचे 21 वार करीत खून केला. निखील आपल्या वागणुकीत सुधारणा करीत नसल्याने व बहिणीला सातत्याने मारहाण करून तिचा छळ करीत असल्याने हा राग डोक्यात ठेवून निलेशने शनिवारी मध्यरात्री भुसावळात आलेल्या मेहुण्याची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मेहुण्याला कुठल्याही परीस्थितीत संपवायचे हाच राग संशयित निलेशच्या डोक्यात असल्याचे खून प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, वांजोळा रोड भागातील दत्त नगर, श्रीराम नगर भागात निखीलची मोठी दहशत होती मात्र अलीकडेच त्याचे अनधिकृत बांधकाम बाजारपेठ पोलिसांनी पाडून त्याची दहशत मोडकळीस आणली होती. तब्बल 19 गुन्हे निखीलविरोधात दाखल असल्याची माहिती समोर आली असून दोन वेळा त्याला हद्दपार करण्यात आले तर मोक्कादेखील पारीत करण्यात आला मात्र खंडपीठाच्या आदेशामुळे त्याच्यावरील कारवाई लांबल्याचे सूत्रांनी सांगितले.
आर्म अॅक्टसह शरीराविरुद्धचे तब्बल 19 गुन्हे !
पोलीस सूत्रांच्या अधिकृत माहितीनुसार, निखील राजपूत विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात 17 तर शहर पोलिसात एक गुन्हा दाखल असून त्यात आर्म अॅक्ट, हद्दपारी आदेशाचे उल्लंघण, जबरी लूट, फौजदारावर हल्ला अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे तर दोन दिवसांपूर्वी फैजपूर पोलीस ठाणे हद्दीत पिंपरूड फाट्यावरील महिंद्रा ढाब्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्याचा कर्मचारी प्रशांत सोनार यास फाईट मारल्याप्रकरणीदेखील त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अटकेवेळी गुंगारा, मोक्काही लांबला मात्र अखेर मृत्यूने गाठलेच !
बाजारपेठ पोलिसात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात निखील वॉण्डेट होता मात्र तो दरवेळी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी होत होता शिवाय त्याच्याविरोधात बाजारपेठच्या फौजदारावर हल्ला केल्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये मोक्काचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला मात्र कारवाईविरोधात उच्च न्यायालयात दाद मागिल्यानंतर सुमारे दिड वर्षांपासून मोक्काप्रकरणी सुनावणी सुरू असल्याने निखीलला दिलासा मिळत गेला शिवाय फैजपूरात त्याला दोन दिवसांपूर्वी अटक झाली असतीतर कदाचित चित्र वेगळे राहिले असते मात्र एकट्या कर्मचार्यावर त्याने साथीदारांसह फायटरने हल्ला करीत पळ काढला मात्र खुनशी स्वभाव व गुन्हेगारी प्रवृत्ती स्वस्थ बसू देत नसल्याने तो शनिवारी रात्री भुसावळात आला व शालकाने अनैतिक संबंधातून त्याला यमसदनी धाडल्याचे समोर आले.
फैजपूरात अटकेच्या वेळी पोलिसावर केला हल्ला !
बाजारपेठ पोलिसात निखिलविरोधात गु.र.क्र. 63/2023, भादंवि कलम 400 401, 386, 393, 342, 324, 109 सह आर्म अॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यात तो वॉण्टेड असल्याने बाजारपेठ पोलिसांनी संशयित येणार्या ठिकाणी पिंपरूड फाट्यावर 1 रोजी रात्री 12.10 सापळा रचला होता. रात्री निखील सुरेश राजपूत (श्रीराम नगर, दत्तनगर, भुसावळ) हा अनिषा उर्फ माही रीतेश रत्नानी (भुसावळ) व तीन अनोळखींसोबत आल्यानंतर कॉन्स्टेबल प्रशांत निळकंठ सोनार (32) यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला मात्र निखीलने फायटरने सोनार यांच्या डोळ्यावर मारहाण करीत संशयितांसोबत स्वीप्टने पळ काढला होता. याप्रकरणी फैजपूर पोलिसात संशयिताविरोधात गुन्हा दाखल आहे.
अनैतिक संबंध जीवावर !
निखील राजपूतने भाग्यश्री यांच्याशी पाच वर्षांपूर्वी प्रेम विवाह केल्यानंतर पुन्हा एका महिलेशी प्रेमसंबंध निर्माण केले व तिच्यासोबत वास्तव्य सुरू केल्याने घरात वादाची ठिणगी पडली. निलेश ठाकूर याने मेहुणा निखील याला अनेकदा समजावले होेते शिवाय हा प्रकार न थांबल्यास जीवानिशी ठार मारेल, अशी धमकीदेखील दिली होती मात्र सुधारणा होत नसल्याने शनिवारी मध्यरात्री निखील आपल्या साथीदारासोबत आल्याची माहिती मिळाल्यानंतर निलेश ठाकून हा दबक्या पावलांनी जलकुंभावर चढला. यावेळी निखील हा साथीदार हर्षल कदमसोबत झोपला असल्याची संधी साधून निलेश ठाकूरने निखीलचा मृत्यू होईपर्यंत तब्बल 21 वार निखीलच्या गळ्यावर, हृदयात, फुफ्फुसात केल्याने त्याचा मृत्यू ओढवला. हर्षलने ही माहिती निखीलच्या पत्नीला दिल्यानंतर पहाटे पाच वाजता खुनाचा उलगडा झाला. ट्रामा केअर सेंटरमध्ये शनिपारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी एलसीबी व स्थानिक पोलिसांच्या काटेकोर बंदोबस्तात निखीलवर यावल रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
खुनातील आरोपी काही तासात जाळ्यात !
मेहुणा निखील राजपूत याच्या खूनप्रकरणी त्याचे वडिल सुरेश पांडू शिंदे (68 दत्तनगर, वांजोळा रोड, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यानंतर संशयित निलेश चंद्रकांत ठाकूर (22, कंडारी, ता.भुसावळ) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र संशयित पसार झाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी निरीक्षक किसनराव नजन पाटील, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, हवालदार विजय नेरकर, हवालदार रमण सुरळकर, हवालदार निलेश चौधरी, हवालदार उमाकांत पाटील, हवालदार यासीन पिंजारी, हवालदार महेश चौधरी, योगेश माळी, सचिन चौधरी, जावेद शहा, प्रशांत सोनार, योगेश महाजन, दिनेश कापडणे, अमर आढाळे यांच्या पथकाने संशयिताला वांजोळा रोड भागातून शनिवारी दुपारी अटक करण्यात आली